खो-खो बद्दल स्मिता बळवळ्ळी ने लिहिलेला सुरेख लेख. आवर्जून वाचा!
*खो-खो dessert गेम*
२०२० मध्ये करोनाने मांडलेल्या उच्छादामुळे न कोणी कोणाला भेटू शकलं, न सण समारंभात सहभागी होऊ शकलं. २०२१ उजाडल्यावर नववर्षाचं स्वागत करताना, ही उणीव भरून काढण्याची इच्छा प्रत्येक मनात जागृत झालीच असणार. संक्रांतीच्या निमित्ताने “मराठी मित्र मंडळाने” आयोजित केलेल्या ‘अप्सरा नव्या युगाची’ ह्या ऑनलाइन स्पर्धेचा पुरेपूर आनंद आपण सर्वांनी लुटला. त्यावेळी काही जणींनी, लवकरच पुढच्या सणाला ऑनलाइन नाही तर, प्रत्यक्षात भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली होती. पण ह्या जीवाणूचा जीवघेणा खेळ थांबण्याऐवजी जोम पकडू लागला.
‘गुढी पाडवा’ म्हणजेच आपल्या मराठी नूतन वर्षाचं आगमन झालं. गृहीणींनी गोड-धोड बनवलंच असणार घरात. पण मनं मात्र निराशेच्या खाईत जात होती. पण “मराठी मित्र मंडळ” नेहमीप्रमाणेच सज्ज होतंच ना, आपल्या मनाला उभारी द्यायला. तेही त्यांच्या स्टाईलमध्ये, ‘मजा’ चाखायची, अहो म्हणजे ‘गोड’ चाखायची नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन. ह्या खेळाचं शीर्षक होतं – “खो-खो dessert गेम”. एका कुटुंबाने, एक कुटुंबापुरती कोणतीही स्वीट डिश बनवायची आणि दुसर्याि कुटुंबापर्यन्त ती नेऊन पोहोचवायची, असा हा खेळ. सद्य परिस्थितीत एकमेकांकडे पदार्थ पोहोचवणं शक्य होईल का, सुरक्षित असेल का... अशा शंकांची पाल मनात चुकचुकली असण्याची शक्यता आहे. पण ऑनलाइन सामान ऑर्डर करतो की आपण! शिवाय “मराठी मित्र मंडळतर्फे” कार्यक्रम शिस्तीत पार पडणार ह्याची खात्री होतीच ना! मग झाला खेळ सुरू.
एक पदार्थ दुसर्याो कुटुंबाकडे पोहोचावला गेला म्हणजेच खो दिला गेला. अशा ह्या खो-खो मध्ये, १० ते १२ कुटुंबियांनी भाग घेतला. बैठी खो-खो खेळात जसं कोणाला खो मिळणार हे शेवटच्या क्षणाला कळतं, तसंच आपल्याला कोणता डेजर्ट खायाला मिळणार हे गुपित ठेवलं गेल्याने खेळातील excitement आणखीनच वाढली. त्यामुळे गृहीणींनी गोड पदार्थ बनावण्यापासून ते, घरात दुसर्याव कुटुंबाकडून स्वीट डिश येईपर्यंत घरातील सगळ्यांचीच उत्सुकता अक्षरशः ताणून धरली गेली. काहींना तर भारतातून इथे परदेशात आल्यावर दीड ते दोन वर्ष खायला न मिळालेला पदार्थ अचानक समोर आला म्हणे. मग तुम्हीच कल्पना करा की! कसा ताव मारला गेला असेल. रसमलाई, गुलाबजाम, ओल्या नारळाच्या करंज्या, आंब्याची खीर, बासुंदी, बेसनाचे लाडू आणि असे इतर बरेच पदार्थ बनवले आपल्या सुगरण गृहीणींनी. अगदी आपली घरातील कामं तर झालीच, शिवाय काहींनी ऑफिसची टेंशन आणि काहींनी तर घरातील मस्तीखोर छोटुकल्यांना सांभाळून, बरं का! खूप काळानंतर एकमेकांच्या भेटीने, भले अंतर ठेवून का होईना आणि त्यांच्याशी आजच्या परिस्थितीत वेळेचं बंधन सांभाळून पोटभर गप्पा मारून मनं ताजीतवानी झाली. शिवाय स्वतःच्याच हातचं खाऊन कंटाळा आलेल्या महिलांनी वेगळ्या हातचा पदार्थ खाऊन, जीभेवरची चव आणि मनातील आनंद बरेच दिवस टिकून राहील, असं मत व्यक्त केलं. बरीच कुटुंबं तर एकमेकांना ओळखतही नव्हती. ह्या भेटीमुळे, सुंदर नवीन नाती तयार झाली, मन अगदी प्रसन्न झालं, असा बहुतेकांचा अनुभव होता. स्वीट डिश चा ‘खो-खो’ ह्या नावामुळे आणि खेळल्या जाणार्याअ अनोख्या पद्धतीमुळे बर्यांच जणी ह्या खेळाकडे आकर्षित झाल्या. असा आगळा वेगळा खेळ आजपर्यंत पाहिला नव्हता आणि आजच्या ह्या कठीण परिस्थितीत इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने, मास्क घालून व सर्व प्रकारच्या नियमांचं पालन करून तो पार पाडला गेला ह्याचं कौतुक बहुतांश कुटुंबियांनी केलं.
भारतात विविध सण तेही वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात. आपल्या संस्कृतीत आलिंगन द्यायची अशी पद्धत नाही खरं तर! केवळ पाहुण्यांच्या भेटीच्या नेत्रसुखानेच मनाला बरं वाटतं. आणि हो, सण कोणताही असो, गोड-धोड हवंच ना! पण गंमत म्हणजे आपल्या भारतीयांना हे गोडाचे पदार्थ फक्त बनवून नव्हे तर ते इतरांना खाऊ घालून खरं समाधान मिळतं. ही अगदी साधी गोष्ट. पण ह्याची महती कळली ती भारतापासून इतक्या लांब दूरदेशी आल्यावरच. करोना काळात तर, हा आनंद लुटता न आल्याची खंत जास्तच वाटू लागली होती. पण ही खंत ह्या खेळाने भरून काढली.
एक विचार आला की, आपण लहानपणापासून अशा प्रकारे सण साजरे करायचो. त्यामुळे हे संस्कार आपल्या मनावर नकळत आणि सहज होत गेले. पण आत्ताच्या पिढीला, खास करून जी भारतापासून दूर आहे, त्यांच्यातही हे संस्कार रुजावेत ह्या दृष्टीने ह्या खेळाचं महत्व खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्याबद्दल “मराठी मित्र मंडळाचे” खूप खूप आभार!
आपल्याला इथे होम-सिक वाटू नये, परदेशांतील सर्व सुखसोयींचा उपभोग घेत असता, आपल्या संस्कृतीचा वारसा जपला जावा, ह्यासाठी “मराठी मित्र मंडळाचे” सदस्य, आपल्या कामातून वेळात वेळ काढून, मेहनतीने अशा कार्यक्रमांचं आयोजन करतात. मग आपणही त्यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊया की!